Skip to main content

हिरवा मटार जुनाट रोगांना दूर करतो का?

“हिरवा मटार करील जुनाट रोगांना दूर” असं म्हटलं जातं. पण कसं ते फार कुणाला माहिती नसतं. आज आपण बघणार आहोत कि हा हिरवा मटार नियमित खाण्यामुळे तुमच्या शरीरातील जुनाट रोग तुमच्या पासून कसे दूर राहतात. त्याचबरोबर हिरवा मटार खाण्याचे इतरही अनेक फायदे आहेत ज्याची तुम्हाला कदाचित फारशी माहिती नसेल.

हिरवा मटार हि फक्त एक भाजी म्हणून आपण ओळखतो. मात्र, या हिरव्या मटारचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात ज्याच्याबद्दल फार कुणाला माहिती नसते किंवा त्याविषयी कुणी फारसं बोलताना दिसत नाही. थंडीचे दिवस सुरु झाले कि हवेमध्ये जसा प्रचंड गारठा वाढतो त्याचबरोबर भाजी मार्केट मध्ये सगळीकडे हिरव्यागार मटारच्या शेंगांनी बाजार फुलून जातो आणि सध्या मटारचा सिझन असल्याने हळूहळू मटाराच्या हिरव्यागार शेंगांनी बाजार फुलून जायला सुरुवात झाली आहे.

हिरव्या मटारा चे दाणे चवीला गोड तर असतातच पण खूप पौष्टिक सुद्धा असतात. हिरव्या मटारामध्ये प्रथिने, फायबर्स, अँटिऑक्सिडंट्स यासह अनेक फायदेशीर पोषक घटक असतात. काही संशोधनात असही दिसून आलं आहे की मटार नियमित खाणाऱ्यांना काही जुनाट आजार जस हृदयविकार, रक्तदाब इत्यादी होण्याचं प्रमाण तुलनेनं कमी असतं.

आपल्याला हे सुद्धा वाचायला आवडेल :-
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काय करावं?

तर असा हा बहुगुणी हिरवा मटार खाण्याचे फायदे आता आपण बघूया.

हिरवा मटार अनेक पोषणमूल्यांनी समृद्ध आहे

हिरव्या मटारामध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, प्रथिने, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, थायमिन, फोलेट, मँगेनीज, लोह, फॉस्फरस इत्यादी घटक असतात. हिरव्या मटारामध्ये कॅलरीज सुद्धा असतात पण त्यांचं प्रमाण तुलनेनं खूप कमी असतं. तसंच मटारामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. त्याचबरोबर मटारामध्ये पॉलिफेनॉल नावाचे अँटिऑक्सिडंट्स असतात. ज्यांचा उपयोग आपल्या शरीराला अनेक प्रकारे होतो. हे अँटिऑक्सिडंट्स आपल्या शरीरातील फ्री रॅडिकल्स ना नष्ट करतात जे आपल्या शरीरातील अनेक त्रासाचं कारण ठरू शकतात.

हिरवा मटार हाडं आणि दातांसाठी फायदेशीर असतो

हिरव्या मटारामध्ये व्हिटॅमिन के असतं जे आपल्या हाडांच्या आणि दातांच्या आरोग्यासाठी अतिशय गरजेचं असतं. तसंच यातील फॉस्फोरस हा घटक सुद्धा हाडांच्या आणि दातांच्या आरोग्यासाठी आवश्यक घटक आहे. तसंच यातील व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी सुद्धा आपल्या हाडं आणि दातांसाठी आवश्यक असतं. थोडक्यात, हिरवा मटार नियमित खाण्यामुळे आपल्या हाडांचा आणि दातांचं आरोग्य उत्तम राहतं.

हिरवा मटार शरीरातील रक्त वाढीसाठी उपयोगी ठरतो

हिरव्या मटारामध्ये लोह मुबलक प्रमाणात असतं. ज्याचा उपयोग आपल्या शरीरातील रक्त वाढीसाठी होतो. तसंच यातील फॉलेट हा घटक सुद्धा आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर करतो. त्यामुळे ऍनिमिया सारख्या त्रासापासून आपला बचाव होतो. त्याचबरोबर यातील व्हिटॅमिन सी आपण खाल्लेल्या अन्नातून लोह शोषून घेण्याचं काम करतं. थोडक्यात, हिरवा मटार नियमित खाण्यामुळे आपल्या शरीरातील लोहाची कमतरता दूर होते.

हिरवा मटार वजन कमी करायला उपयोगी

मटार हे प्रथिने आणि फायबर्सनी समृद्ध असतात. त्यामुळे मटार खाल्ल्यानंतर आपल्याला अनावश्यक भूक लागण्याचं प्रमाण कमी होतं. पुरेशा प्रमाणात प्रथिने आणि फायबर्स पोटात गेल्याने भूक नियंत्रणात राहते आणि अनावश्यक खाणं कमी होतं. त्यामुळे शरीरात अनावश्यक चरबी जमा होत नाही. पर्यायाने तुमचं वजन हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते. तसंच स्नायूंच्या बळकटीसाठी आणि हाडांच्या आरोग्यासाठी पुरेशा प्रमाणात प्रथिनांचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. मटार खाल्ल्याने हेच साध्य होतं. तसंच, पुरेशी प्रथिनं शरीराला मिळाल्याने बांधा सुद्धा सुडौल होतो.

हिरवे मटार रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात

हिरव्या मटारमध्ये अनेक गुणधर्म असतात जे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात. याचं एक प्रमाण म्हणजे मटाराचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे अन्न खाल्ल्यानंतर तुमच्या रक्तातील साखर किती लवकर वाढते हे मोजण्याचं एक परिमाण. मटाराचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने तसंच प्रथिनं आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्यानं रक्तात साखर शोषून घेण्याचं प्रमाण कमी होतं. पर्यायाने मटार खाणे मधुमेह असलेल्यांना सुद्धा फायदेशीर ठरतं. अर्थात मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी मटार मर्यादित प्रमाणात खाणं योग्य ठरेल तसेच डॉक्टरांनी मनाई केली असल्यास मटार खाणं मधुमेह असलेल्यांनी टाळलं पाहिजे.

हिरव्या मटारमधील फायबरमुळे पचनाला फायदा होतो

हिरव्या मटारमध्ये फायबरचे प्रमाण मुबलक असते, जे पचनासाठी अतिशय चांगलं असतं. तसंच फायबर्स मुळे बद्धकोष्ठता, गॅस, अपचन आणि पित्त अशा प्रकारचे त्रास सुद्धा कमी होतात. त्याचबरोबर पोट साफ राहतं आणि शरीरामध्ये अनावश्यक घटक रहात नाहीत आणि जे शरीरामध्ये विषारी पदार्थ निर्माण होत नाहीत. थोडक्यात, एकंदर पोटाच्या आरोग्यासाठी मटार उपयोगी ठरतात. त्यामुळे, पोटात होणारी जळजळ, वेदना इत्यादी प्रकार जे सामान्यपणे गॅस, पित्त आणि अपचनामुळे होतात ते सुद्धा हळूहळू कमी होतात.

हिरवे मटार काही जुनाट आजारांपासून आराम देतात

मटारच्या नियमित सेवनाने काही जुनाट रोग होण्याचं प्रमाण कमी होतं.

त्यात पहिला आहे हृदयरोग

हिरव्या मटारामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम यासारखी खनिजे असतात. या खनिजांमुळे हृदयाशी संबंधित रोगांपासून आराम मिळतो. हे घटक रकवाहिन्यांना मऊ आणि लवचिक ठेवतात ज्यामुळे शरीरतील रक्तपुरवठा सुरळीतपणे सुरु राहतो. आणि रक्तदाब सामान्य आणि नियंत्रित राहतो. हिरव्या मटारामध्ये असणारे फायबर्स आपल्या शरीरातील खराब कोलेस्टेरॉल म्हणजे LDL कमी करते असे दिसून आले आहे. या खराब कोलेस्टेरॉलमुळेच म्हणजे LDL मुळेच हृदयविकाराचा धोका वाढतो.

दुसरा आहे मधुमेह

हिरव्या मटारामधील काही घटक रक्तातील साखर नियंत्रित करतात, ज्यामुळे मधुमेह रोखण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी फायदा होतो. हिरव्या मटाराचा ग्लयसिमीक इंडेक्स कमी असतो. ज्यामुळे मटार खाल्ल्यावर रक्तातील साखर लगेच वाढत नाही. आणि त्यामुळेच मधुमेह असणाऱ्यांना त्याचा फायदा होतो.

तिसरा आहे कर्करोग

हिरवे मटार नियमितपणे खाल्ल्याने कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो, मुख्यतः मटारमधील अँटिऑक्सिडेंट शरीरातील फ्री रॅडिकल्स ला रोखतात किंवा त्यांचं उत्पादन होऊ देत नाहीत ज्यामुळे कॅन्सर सारखा रोग होण्याचं प्रमाण कमी होतं. मंडळी, हे फ्री रॅडिकल्सच आपल्या शरीरातील अनेक रोगांचं कारण आहेत जे मटार खाण्यामुळे कमी होतात.

थोडक्यात सांगायचं तर हिरव्या मटारच्या नियमित सेवनाने हृदयविकार, कर्करोग आणि मधुमेह यांसारखे आजार होण्याचं प्रमाण कमी होतं.

अँटीन्यूट्रिएंट्स म्हणजे काय?

अँटीन्यूट्रिएंट्स म्हणजे असे घटक जे शरीराला पोषक खनिजे आणि जीवनसत्त्वे शोषून घेण्यापासून रोखतात. याचा परिणाम म्हणून आपल्या शरीराला आवश्यक पोषणमूल्य मिळत नाहीत. उदा. लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम इत्यादी. तसेच मटार खूप जास्त प्रमाणात खाण्यामुळे गॅस होणे आणि पोट फुगणे असे त्रास सुद्धा होऊ शकतात.

हिरवे मटार किती प्रमाणात आणि कसे खावेत?

हिरवे मटार खाताना योग्य प्रमाणात खावेत. म्हणजे साधारण एकावेळी एक किंवा दोन वाट्या एवढेच मटार खावेत. म्हणजे त्याचा योग्य तो फायदा होईल आणि त्रास होणार नाही. तसंच हिरवे मटार कच्चे खाण्यापेक्षा शिजवून खावे ज्यामुळे त्यातील अँटीन्यूट्रिएंट्स चं प्रमाण कमी होईल आणि त्यातली पोषणमूल्य शरीराला मिळतील. त्यामुळे हिरव्या मटारची भाजी, उसळ किंवा आमटी खाण्याची पद्धत आपल्याकडे आहे.

तर मंडळी, आजच्या लेखामध्ये आपण हिरवे मटार खाण्याचे काही फायदे बघितले. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.

Comments