साधारणपणे उन्हाळा सुरु झाला कि बऱ्याच जणांना उष्णतेचा त्रास व्हायला सुरुवात होते. याच प्रमुख कारण म्हणजे हवेतील उष्णता एकदम वाढायला सुरुवात होते. त्यामुळे साहजिकच आपल्या शरीरातील उष्णता सुद्धा वाढायला सुरुवात होते. आणि आपल्या शरीरातील उष्णता वाढली कि त्याचे अनेक त्रास व्हायला सुरुवात होते. पण मग ही शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काय करावं?
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी अनेक उपाय आहेत जे आज आपण या लेखामध्ये अगदी सविस्तर बघणार आहोत. हे अगदी सोपे आणि घरगुती उपाय आहेत जे आपण सहजपणे करू शकतो. आधी आपण बघूया शरीरात उष्णता का वाढते? मग बघूया शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काय करावं? आणि मग बघूया उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून काय करावं?शरीरात उष्णता का वाढते?
शरीरात उष्णता वाढण्याची अनेक कारणं आहेत.
- बाहेरची हवा उष्ण असते त्या हवेच्या प्रभावामुळे आपल्या शरीरात सुद्धा उष्णता वाढते.
- उन्हाळ्यात आपल्याला सारखा घाम येतो. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. आणि ती पातळी पुन्हा भरून निघाली नाही तर शरीरात उष्णता वाढते परिणामी डीहायड्रेशन चा त्रास होतो
- फार तळकट, तेलकट, मसालेदार पदार्थ, फार जळजळीत किंवा तिखट पदार्थ खाणे तसंच मांसाहार करणे यामुळे सुद्धा शरीराचं तापमान वाढतं कारण हे पदार्थ मुळातच उष्ण असतात.
- फार थंड पदार्थ सारखे खाण्यामुळे सुद्धा उष्णता होते उदा. बर्फ, आईसक्रीम असे पदार्थ खाताना थंड वाटतात पण ते उष्ण असतात.
तर ही होती काही कारण ज्यामुळे शरीरात उष्णता वाढू शकते. आता बघूया शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काय करावं?
पश्चिमोत्तानासन काय आहे?
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काय करावं?
१. भरपूर पाणी प्या
भरपूर पाणी पिणे हा उष्णता कमी करण्याचा एक उपाय सर्वोत्तम आहे. उन्हाळ्याच्या दिवसात किंवा इतर ऋतूंमध्येही जेव्हा आपल्या शरीरातील उष्णता वाढते तेव्हा त्या उष्णतेला कमी करण्यासाठी थोड्या थोड्या वेळानी पाणी पिणं योग्य ठरेल. मात्र, पाणी फार थंड नसावं किंवा फ्रिज मधील पाणी पिणं सुद्धा टाळावं.
सारखं पाणी प्यायचं म्हणजे निदान दर अर्ध्या तासानी किंवा दर एक तासानी एकदा पाणी प्यावं. त्यामुळे आपल्या अंगात निर्माण होणारी अतिरिक्त उष्णता पाण्यामुळे शोषली जाते. तसंच, घामावाटे जे अतिरिक्त पाणी शरीराबाहेर पडत त्यामुळे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. मात्र थोड्या थोड्या वेळाने पाणी पीत राहिल्याने शरीरातील पाण्याची कमी भरून निघते.
२. उन्हाळ्यात मिळणारी फळे खा
आपल्या निसर्गाची रचनाच अशी आहे कि फळे सुद्धा ऋतूनुसार पिकतात म्हणजे ज्या ऋतूमध्ये ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्यानुसार फळं मिळतात. उन्हाळ्याच्या दिवसात हवेत उष्णता खूप वाढते त्यामुळे आपल्या शरीराला किंवा अगदी प्राण्यांना सुद्धा पाण्याची सतत गरज लागते.
त्यामुळेच निसर्ग उन्हाळ्यात अशी फळ निर्माण करतो ज्यात पाण्याचं प्रमाण भरपूर असतं. अशा फळांमध्ये कलिंगड, टरबूज, अननस, अंजीर अशी फळ उन्हाळ्यात मिळतात तसेच आंबा किंवा कैरी मध्ये सुद्धा भरपूर पाण्याचं प्रमाण असतं. अशी फळ खाल्याने आपल्या शरीरात आपोआपच पाण्याचं संतुलन राखलं जातं आणि उष्णता सुद्धा कमी होते.
३. सात्विक आहार घ्यावा
उन्हाळ्याच्या दिवसात बाहेरची हवा खूप गरम असते. त्यामुळे शरीराचं तापमानही वाढलेलं असतं आणि अशा वेळी जर आपण खूप तिखट, जळजळीत आणि मसालेदार अन्न खाल्लं तर त्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता अजूनच वाढते. पर्यायाने शरीराचं तापमान नियंत्रित ठेवायला आपल्याच शरीरातील पाणी वापरलं जातं आणि त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता वाढते.
तसंच उन्हाळ्यात पचनशक्ती मंदावते त्यामुळे पचायला जड पदार्थ खाल्ले तर पचनाचा त्रास होतो. न पचलेले अन्न शरीरात उष्णता निर्माण करतं. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात तरी निदान पचायला हलके पदार्थ खावेत.
यामध्ये रोजच्या जेवणातले पदार्थ म्हणजे भात, पोळी किंवा भाकरी, वरण किंवा आमटी, तांदुळाची खिचडी इत्यादी असावे. तसेच काकडी, टोमॅटो अशा भाज्यांच्या कोशिंबिरी चा सुद्धा जेवणात समावेश करावा. दुपारच्या जेवणात ताकाचा किंवा सोलकढीचा समावेष करावा. ताक पिताना अर्धे ताक आणि अर्धे पाणी असे एकत्र करून प्यावे. जेवणात साजूक तुपाचा समावेश करावा. तसंच अन्न शक्यतो ताजं खावं. शिळं अन्न किंवा फ्रिज मधलं अन्न खाणं टाळावं.
४. वेगवेगळी सरबतं प्यावीत
उन्हाळ्याच्या दिवसात अनेक सरबतं मिळतात. खरं म्हणजे ही सरबतं इतर ऋतूंमध्येही मिळतात. पण उन्हाळ्यात त्यांचा वापर जास्त होतो कारण उन्हाळ्यात आपल्याला पाण्याची जास्त गरज असते. या सरबतांमध्ये कोकम सरबत, लिंबू सरबत, वाळा सरबत यांचा समावेश होतो. तसंच कैरीचे पन्हे, उसाचा रस, नारळपाणी, नीरा यांचाही समावेश होतो.
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी चहा, कॉफी पिणं कमी करावं किंवा टाळावं. त्या ऐवजी नैसर्गिक थंडपणा असणारी सरबत पिण्यामुळे शरीराची तहानही भागते, शरीर थंडही होतं आणि ही सरबत चवीलाही चांगली असतात.
५. थंड पाण्याने अंघोळ करावी
उन्हाळ्याच्या दिवसात शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी सोसत असेल तर थंड पाण्याने आंघोळ करावी. थंड पाणी म्हणजे सामान्य तापमान असलेलं पाणी किंवा गरम न केलेलं पाणी. थोडक्यात, जे आपल्या घरातल्या नळाला येत ते पाणी त्या पाण्याने अंघोळ करावी.
सुरुवातीला एकदम थंड पाणी अंघोळीला न घेता कोमट पाणी घ्या. थोड्या थोड्या दिवसांनी त्यात थंड पाण्याचं प्रमाण वाढवा आणि गरम पाण्याचं प्रमाण कमी करा आणि अशा प्रकारे आपल्या शरीराला थंड पाण्याची सवय झाली कि मग नियमित थंड पाण्याने अंघोळ सुरु करा.
थंड पाण्याने अंघोळ केल्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होते. उष्णतेपासून आराम मिळतो. त्वचेची जळजळ सुद्धा कमी होते. ज्याला आपण अंगाची लाहीलाही होणे म्हणतो ती सुद्धा कमी होते. मात्र थंड पाणी सोसत नसेल तर कोमट पाण्याने अंघोळ करावी जेणेकरून त्याचा त्रास होणार नाही.
६. खोबरेल तेलाने मालिश
खोबरेल तेल सुद्धा शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. खोबरेल तळ खरतर वर्षभर वापरलं तरी चालतं. पण खासकरून उन्हाळ्यात रात्री झोपताना डोक्याला खोबरेल तेल लावावे किंवा तेलाने मालिश करावी. ज्यामुळे उष्णता कमी होईल.
तसंच, खोबरेल तेलाने तळपायांना सुद्धा मालिश करावी यामुळे सुद्धा अंगातील उष्णता हळू हळू कमी होते आणि आपलं शरीर थंड राहतं. तसेच यामुळे झोपही चांगली लागते.
उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून काय करावं?
१. थंड गोष्टी खाणे पिणे टाळावे
आपल्याला हा प्रकार हास्यास्पद वाटेल पण हे खरं आहे. आपण उन्हाळ्यात थंड पाणी, शीतपेय, आइस्क्रीम खातो. हे प्रकार कधीतरी ठीक आहेत. पण हे प्रकार सारखे खाल्ल्याने त्याचा त्रास होऊ शकतो कारण हे प्रकार जिभेला थंड वाटले तरी ते उष्ण असतात. त्यामुळे आपल्या अंगातील उष्णता वाढू शकते.
तसंच, थंड पाणी प्यायचे असल्यास माठातील पाणी प्यावे. कारण हे नैसर्गिक रीतीने थंड केलेल असतं. फ्रिज मधलं पाणी कृत्रिम रीतीनं थंड केलेलं असतं त्यामुळे ते आरोग्यासाठी चांगलं नसतं. त्यामुळे सर्दी, खोकला, कफ असे त्रास होऊ शकतात.
२. उन्हातून घरी आल्यावर लगेच पाणी पिणे टाळावे.
उन्हामध्ये आल्यावर आपल्या शरीराचं तापमान वाढलेलं असतं. त्यामुळे उन्हातून घरी आल्यावर लगेच पाणी पिऊ नये. आधी थोडा वेळ आपल्या शरीराचं तापमान सामान्य होऊ द्यावं. मग ५-१० मिनिटांनी गूळ / साखर खाऊन मग पाणी प्यावे.
उन्हातून घरी आल्यावर लगेच पाणी पिण्यामुळे पोटात दुखणे, डोके दुखणे असे त्रास होऊ शकतात किंवा इतरही काही प्रकारचे त्रास होऊ शकतात. तसंच उन्हातून घरी आल्यावर लगेच काहीच खाऊपिऊ सुद्धा नये. त्यामुळे सुद्धा पोटदुखी किंवा इतर त्रास होऊ शकतो.
तसंच जेवण झाल्यावर लगेच घराबाहेर पडू नये. त्यामुळे पचनाचा त्रास किंवा पित्ताचा त्रास होऊ शकतो.
३. विकतची सरबतं, फळांचे रस पिणं टाळावं
बाहेर विकत मिळणारी सरबते, फळांचे रस पिणे शक्यतो टाळावे किंवा कमी प्रमाणात प्यावे. कारण त्यात वापरले जाणारे पाणी, बर्फ आणि फळे किंवा लिंबे सुद्धा कधीकधी खराब असू शकतात. त्या पाण्याची आपल्याला बाधा होऊ शकते. त्यामुळे शक्यतो सरबतं, फळांचे रस असे प्रकार खात्रीशीर ठिकाणीच विकत घ्यावेत किंवा हे प्रकार घरीच तयार करावेत.
४. शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ खाणं टाळावे
मगाशी सांगितल्याप्रमाणे उन्हाळ्यात फार तळकट, तेलकट, मसालेदार पदार्थ, फार जळजळीत किंवा तिखट पदार्थ खाणे टाळावे. मांसाहार सुद्धा कमी करावा किंवा टाळावा असे पदार्थ खाण्यामुळे शरीरात खूप उष्णता निर्माण होते आणि ती उष्णता कमी करायला शरीरातील पाणी वापरलं जातं
तसंच हे पदार्थ पचायला जड असतात. त्यामुळे ते आपल्या पोटात पचनाशिवाय जास्त वेळ तसेच राहतात आणि त्याचा त्रास होऊ शकतो म्हणजे अपचन, गॅसेस, ऍसिडिटी, बद्धकोष्ठता असे त्रास होऊ शकतात.
५. उन्हात फिरणे टाळावे
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये विनाकारण उन्हात जाणे टाळावे कारण त्यामुळे आपल्याला उष्णतेचे त्रास किंवा विकार होऊ शकतात. उदाहरणार्थ, चक्कर येणे, डोळ्यांपुढे अंधारी येणे, उलटी तसंच मळमळ, त्वचेची जळजळ, डोळ्यांची जळजळ, पोटदुखी इत्यादी त्रास होऊ शकतात.
तुमचं काम समजा फिरतीचं असेल तर सनकोट, गॉगल, टोपी/हेल्मेट घालावे. आपल्या अंगाला शक्यतो कमीत कमी ऊन लागेल असे कपडे घालावेत. सैलसर सुती कपडे घालावे. फार घट्ट कपडे घालू नयेत म्हणजे शरीराला हवा लागेल एवढे सैल कपडे घालावेत.
निष्कर्ष
तर अशा प्रकारे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काय करावं? हे आपण बघितलं. या लेखात आधी सांगितल्या प्रमाणे काळजी घेऊन आपण उन्हाळ्याच्या दिवसात होणाऱ्या त्रासांपासून सुरक्षित राहू शकतो. पण एवढी काळजी घेऊनसुद्धा जर काही त्रास झाला तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक ठरतं. आणि जास्त काही त्रास झाल्यास स्वतः गोळ्या घेऊन इलाज करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण स्वतः औषधं घेणं कधीकधी धोकादायक ठरू शकतं.
FAQ
१. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काय करावे?
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी सरबतं प्यावीत, अशी भाज्या किंवा फळं खावी ज्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं उदा कलिंगड, काकडी, टोमॅटो इत्यादी फळ खावीत. फार तळकट, तिखट, मसालेदार पदार्थ खाऊ नयेत. मांसाहार टाळावा.
२. काळ्या मनुका शरीरातील उष्णता कमी करतात का?
हो. काळ्या मनुका शरीरातील उष्णता कमी करतात. काळ्या मनुकांचा जास्त फायदा मिळवण्यासाठी त्या रात्रभर पाण्यात भिजवून ठेवाव्या आणि सकाळी उपाशी पोटी खाव्या. त्यामुळे पोटही साफ होत आणि शरीरातील उष्णता कमी होते.
३. थंड पाण्याने अंघोळ केल्यामुळे उष्णता कमी होते का?
थंड पाण्यामुळे अंघोळ केल्यामुळे त्वचेची जळजळ कमी होते. शरीराला थंडावा मिळतो तसंच उन्हाळ्यात होणार घामोळ्यांचा त्रास होत नाही. तसेच उष्माघात होत नाही.
४. पपई शरीरातील उष्णता कमी करते का?
पपई हे फळ शरीरातील उष्णता वाढवते. म्हणूनच हे फळ उन्हाळ्यात खाण टाळावं तसंच गर्भवती महिलांनी सुद्धा पपई खाणं टाळावं.
५. उष्माघात म्हणजे काय?
उष्माघात म्हणजे उष्म्याचा किंवा उष्णतेचा शरीरावर होणारा आघात. यामध्ये शरीराचं तापमान खूप जास्त वाढतं मात्र ते नैसर्गिक रित्या कमी होत नाही. अशा वेळी चक्कर येणे, शुद्ध हरपणे, ओकारी येणे, असे किंवा या पेक्षा जास्त त्रास होतात. अशा वेळी त्या व्यक्तीला सावलीत बसवावे आणि शरीरावर, तोंडावर थंड पाण्याचे हबके मारावे किंवा डोक्यावर थंड पाण्याची धार लावावी ज्यामुळे त्या व्यक्तीच शरीर पुन्हा थंड होईल.
Comments
Post a Comment