व्यायाम म्हटले की हल्लीच्या काळात व्यायाम शाळेत (जिम) जाणे आणि तिथे जाऊन थोड्याच दिवसात पिळदार शरीरयष्टी तयार करुन सर्वांना चकीत करणे असा एक समज रूढ झाला आहे. पण आपण कुठल्याही पैलवान किंवा बॉडी बिल्डरला विचारले असता त्यामागचे त्याचे अनेक दिवसाचे कष्ट, संयम, मनाची तयारी, व्यायामाची पूर्वतयारी अणि इतर अनेक गोष्टी लक्षात येतात.
कुठलाही व्यायाम सुरु करण्यापूर्वी व्यायामाची पूर्वतयारी करणे आवश्यक असते. उदा. योग्य वेळ, व्यायामाची साधने किंवा उपकरणे, योग्य जागा इ. त्यामुळे इच्छुकांनी व्यायाम सुरु करण्याआधी खालील गोष्टींचे पालन करावे, जेणेकरून व्यायामाचा जास्तीत जास्त फायदा होईल.
- कुठलाही व्यायाम अनशेपोटी म्हणजे काहीही खाल्यानंतर किमान ४ तासांनी करावा. त्यामुळेच साधारणपणे व्यायाम पहाटे किंवा सकाळी करण्याची पद्धत आहे.
- व्यायाम केल्यावर किमान ४०-४५ मिनिटे काहीही खाऊ नये. यामागे शास्त्रीय कारण असे कीं व्यायामाने शरीरातील रक्तपुरवठा एका ठराविक ठिकाणी जास्त असतो. अशावेळी अन्न पोटात गेल्यावर जठराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही आणि अन्नपचन नीट होत नाही. त्यामुळे गॅस, अपचन इ. त्रास होण्याचा संभव असतो.
- कुठलाही व्यायाम करताना मन प्रसन्न ठेवावे. तब्येत बरी नसताना किंवा शारीरिक दुखापत झालेली असताना व्यायाम करू नये
- योगासने अणि मर्दानी प्रकारचे व्यायाम (जोर, बैठका, सूर्यनमस्कार इ.) मधे किमान एक तासाचे अंतर ठेवावे.
- व्यायामासाठी स्वच्छ जागा, भरपूर सूर्यप्रकाश, मोकळी शुद्ध हवा असावी.
- व्यायाम उत्साह वाटेल तसेच सहज जमेल एवढाच करावा. गरज वाटेल तेव्हा मित्र मंडळींची मदत घ्यावी. पण कुठलीही जोरजबरदस्ती करू नये. त्यामुळे दुखापत होण्याचा संभव असतो.
- कुठलाही व्यायामाचे फायदे, तो व्यायाम दीर्घकाळ(किमान ३-४ महीने) केल्यानंतरच दिसतो
- व्यायाम सुरु करताना आधी थोड़ा वेळ सुरु करून हळूहळू कालावधी वाढवावा. एकदम जास्त वेळ केल्यास त्रास होण्याचा संभव असतो.
तेव्हा वरील दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून त्याप्रमाणे व्यायामाची पूर्वतयारी करावी. व्यायाम हा सहज सोप्या पद्धतीने अणि नियमित करावा. आपणा सर्वांना शुभेछा.
Comments
Post a Comment