मनाची एकाग्रता ही बुद्धीचं काम करणाऱ्या लोकांसाठी अतिशय महत्वाची असते. विद्यार्थ्यांसाठी, खेळाडूंसाठी किंवा असं कुठलाही काम ज्यात अतिशय एकाग्र होण्याची गरज लागते अशा सर्व लोकांसाठी सिद्धासन हे अतिशय उपयुक्त आणि सोपं आसन आहे.
योगाभ्यास करण्यासाठी सुद्धा मनाची एकाग्रता लागते म्हणूनच इतर सर्व आसनांच्या आधी हे आसन केलं जातं ज्यामुळे पुढील आसनांचा अभ्यास एकाग्रतेने होऊ शकेल.
सिद्धासन म्हणजे काय?
सिद्धासन म्हणजे सिद्ध लोकांचे आसन किंवा आसनांचा अभ्यास करायला सिद्ध करणारे आसन. या आसनाचा नियमित अभ्यास करणाऱ्यां लोकांमध्ये आपल्या मनावर खूप चांगल्या प्रकारे ताबा ठेवण्याची क्षमता असते. ज्यांना एखादी सिद्धी मिळवायची आहे म्हणजे एखादं ध्येय गाठायचं आहे अशा लोकांसाठी सिद्धासन हे अतिशय उपयोगी आहे.
सिद्धासन हे मुख्यत्वे मानसिक एकाग्रतेसाठी उपयोगी पडते. तसेच कुठल्याही प्रकारचे श्वसनाचे व्यायाम अथवा ध्यान करताना सर्वात सहज अणि सोपे आसन म्हणून याचा निश्चित उपयोग होतो. माणसाच्या मनाचे शत्रु समजले जातात ते षडरिपु म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांवर नियंत्रण मिळवून देण्याची ताकद सुद्धा या आसनामध्ये दिसून येते.
आज या लेखामध्ये आपण हे आसन करायची योग्य पद्धत किंवा विधी आणि सिद्धासनाचे फायदे याबद्दल माहिती घेणार आहोत.
सिद्धासन करण्यापूर्वी घ्यावयाची खबरदारी
- हे आसन उपाशी पोटी करावे तसेच जेवणाच्या ३-४ तास आधी किंवा जेवल्यानंतर ३-४ तासांनी करावे
- जेवणाच्या आधी किंवा जेवणानंतर लगेच हे आसन करू नये
- हे आसन करताना श्वास सामान्य ठेवा
- तुम्हाला काही दुखापत असल्यास हे आसन करू नका.
- आजारी असल्यास किंवा अशक्तपणा असल्यास हे आसन करू नका.
- जोर जबरदस्तीने किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या मदतीने जबरदस्तीने आसन करण्याचा प्रयत्न करू नका. सहजपणे जमत असल्यास करा.
- या लेखामध्ये या पुढे दिलेल्या माहिती प्रमाणे आसन करण्याचा प्रयत्न करा
- आसन करण्यापूर्वी शरीर जड झाल्यासारखं वाटत असेल तर आधी थोडा वॉर्म अप करा म्हणजे शरीराचे स्नायू मोकळे होतील
तेव्हा हे आसन करण्यापूर्वी आता सांगितलेली खबरदारी नक्की घ्या म्हणजे आसन करणं
सोपं जाईल.
आता आपण बघूया सिद्धासन आसन कसं करायचं?
सिद्धासन आसन विधी
सिद्धासन हे इतर आसनांच्या तुलनेने अतिशय सोपं आहे. सिद्धासन करण्यासाठी दोन पायऱ्या आहेत. ज्या लोकांना मांडी घालता येत नाही त्यांच्या साठी अर्ध सिद्धासन म्हणजे सिद्धासन आधी एकाच पायाने करायचं आणि मग दुसऱ्या पायाने करायचं.
अर्ध सिद्धासन (उजव्या पायाने)
- सर्वप्रथम जमिनीवर अथवा आसनावर बसावे.
- शरीर अगदी हलके ठेवा, शरीरावर आणि मनावर अजिबात ताण येऊ देऊ नका.
- आता, दोन्ही पाय सरळ करा आणि एकमेकांना समांतर ठेवा
- हळूहळू उजवा पाय गुडघ्यात दुमडा उजव्या पायाची टाच शिवणी खाली (गुदद्वारापाशी) ठेवावी.
- या स्थितीत सरळ ठेवलेल्या डाव्या पायावर ताण येत असेल तर तो पाय अगदी थोडासा गुडघ्यात दुमडा. (इथं आपलं उजव्या पायाने अर्ध सिद्धासन पूर्ण झालं).
- या स्थिती पाठीचा कणा शक्य असेल तेवढा ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा
- या स्थितीत ५-१० सेकंद थांबा आणि मग उजवा पाय हळूहळू सरळ करा.
ही अर्ध सिद्धासनाची एक स्थिती झाली. आता आपण दुसऱ्या पायाने आसन करू.
अर्ध सिद्धासन (डाव्या पायाने)
अर्ध सिद्धासन उजव्या पायाने करून झाल्यावर डाव्या पायाने सुद्धा करावे लागते.
- उजव्या पायाने अर्ध सिद्धासन करून झाल्यावर दोन्ही पाय सरळ करा आणि एकमेकांना समांतर ठेवा
- आता, हळूहळू डावा पाय गुडघ्यात दुमडा
- डाव्या पायाची टाच शिवणी खाली (गुदद्वारापाशी) ठेवावी.
- या स्थितीत सरळ ठेवलेल्या उजव्या पायावर ताण येत असेल तर तो पाय अगदी थोडासा गुडघ्यात दुमडा. (इथं आपलं डाव्या पायाने अर्ध सिद्धासन पूर्ण झालं).
- या स्थितीत ५-१० सेकंद थांबा आणि मग डावा पाय हळूहळू सरळ करा.
ही अर्ध सिद्धासनाची दुसरी स्थिती झाली. म्हणजे आपलं अर्ध सिद्धासन पूर्ण झालं.
अर्ध सिद्धासन चांगल्या प्रकारे जमायला लागल्यावर मग आपण पूर्ण आसन करू शकता. आता आपण बघूया पूर्ण सिद्धासन कसं करायचं?
पूर्ण सिद्धासन विधी (दोन्ही पायांनी)
- सर्वप्रथम जमिनीवर अथवा आसनावर बसा.
- शरीर अगदी हलके ठेवा
- आता, दोन्ही पाय सरळ करा आणि एकमेकांना समांतर ठेवा
- हळूहळू उजवा पाय गुडघ्यात दुमडा आणि उजव्या पायाची टाच शिवणी खाली (गुदद्वारापाशी) ठेवा.
- मग, डावा पाय हळूहळू गुडघ्यात दुमडा आणि डाव्या पायाची टाच उजव्या पायाच्या टाचेवर येईल अशी ठेवा. (संदर्भ - चित्रामध्ये दिल्याप्रमाणे)
- बाकीचे शरीर ताठ ठेवून दृष्टी सरळ ठेवावी. (काही मंडळी दृष्टी नासिकाग्रावर अथवा दोन भुवयांच्या मध्ये देखील ठेवतात)
- दोन्ही हात गुडघ्यावर सरळ ठेवावे.
- मनात कुठल्याही चांगल्या विषयाचे अथवा परमेश्वराचे चिंतन करावे.
- श्वास नैसर्गिकरित्या होईल तेवढा घ्यावा. श्वास रोखून धरू नये
- या अवस्थेमधे सुरुवातीला १०-२० सेकंद बसावे किंवा पायाला रग लागत असेल तर आसन सोडावे.
- आसन सोडण्यासाठी डावा पाय हळूहळू सरळ करावा. मग उजवा पाय सरळ करावा.
इथे आपलं सिद्धासन पूर्ण झालं. आता एका बाजूने आसन केल्यानंतर दुसऱ्या बाजूने किंवा दुसऱ्या पायाने सुद्धा करणे आवश्यक आहे. इथे आधी डावा पाय दुमडून त्याची टाच शिवणी खाली (गुदद्वारापाशी) ठेवावी लागते आणि मग उजवा पाय दुमडून तो डाव्या पायाच्या टाचेवर ठेवावा.
अशा प्रकारे दोन्ही पायाने हे आसन करणे आवश्यक आहे.
सिद्धासन केव्हा आणि किती वेळ करावे
- सिद्धासन हे सामान्यपणे इतर सर्व आसनांच्या आधी करायचं आसन आहे त्यामुळे इतर आसने करायची जी वेळ असेल त्या वेळेला सर्वात आधी हे आसन करावे म्हणजे पुढील आसनांचा अभ्यास योग्य प्रकारे आणि एकाग्रतेने होऊ शकतो.
- हे आसन उपाशीपोटी करावे म्हणजे जेवणाच्या किंवा काहीही खाण्याच्या आधी एक तास आणि नंतर किमान ३-४ तासांनी करावे
- सुरुवातीला सिद्धासनात १०-२० सेकंद बसून हळूहळू सवयीनुसार कालावधी वाढवावा. सामान्यपणे ३ ते ५ मिनिटे हे आसन करण्यास हरकत नाही.
टीप: आसन करताना कुठल्याही प्रकारचा त्रास वाटल्यास किंवा पायांवर जास्त ताण येत असल्यास आसन करणे थांबवावे.
तर हे होते सिद्धासन करण्याच्या वेळा बाबत काही नियम. आता आपण बघूया सिद्धासनाचे काही फायदे.
सिद्धासन फायदे
- या लेखामध्ये सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मानसिक एकाग्रतेसाठी सिद्धासन हे आसन अतिशय उपयोगी ठरते आणि मानसिक एकाग्रते मुळे आपला पुढील आसनांचा चांगला अभ्यास होतो.
- माणसाच्या मनाचे शत्रु समजले जातात ते षडरिपु म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांवर नियंत्रण मिळवून देण्याची ताकद या आसनामध्ये दिसून येते.
- पाठीचा कणा ताठ राहिल्या मुळे आपल्या शरीराला होणारे सर्व फायदे मिळतात. या फायद्यांमध्ये पाठीच्या कण्याला उत्तम रक्तपुरवठा होणे, पाठीच्या कण्याला ताठपणा येतो, कण्याची ताकद वाढते इत्यादि फायदे होतात
- मानसिक आरोग्य सुधारतं, मनातील चिंता, काळजी कमी होते.
निष्कर्ष
सिद्धासन हे मन शांत करण्यासाठी, ध्यान लावण्यासाठी तसंच पाठीचा कणा मजबूत करण्यासाठी अतिशय उपयुक्त आसन आहे. हे आसन नियमित योगाभ्यासाच्या सुरुवातीला करावे ज्यामुळे मनाची एकाग्रता वाढेल आणि पुढील सर्व आसने चांगल्या प्रकारे केली जातील.
त्यामुळे या लेखात सांगितल्याप्रमाणे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून या आसनाचा नियमित अभ्यास करा आणि आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी दिलेल्या ज्ञानाचा पूर्ण लाभ घ्या.
FAQ
सिद्धासन कुठल्या प्रकारचे आसन आहे?
सिद्धासन पायाने करायचे आसन आहे जे ध्यानधारणा किंवा मन एकाग्र करण्यासाठी तसंच दररोजच्या योगाभ्यासाची सुरुवात करून देणारं आसन आहे.
मासिक पाळी दरम्यान आपण सिद्धासन करू शकतो का?
सिद्धासन हे अतिशय सोपे आसन आहे त्यामुळे हे आसन मासिक पाळी दरम्यान करायला हरकत नाही. मात्र, पाठ दुखत असेल तर किंवा इतर काही त्रास होत असतील तर मात्र हे आसन करणे टाळावे.
सिद्धासन किती वेळ करावे?
नवशिक्यांनी सिद्धासन १० ते २० सेकंदाने सुरुवात हळूहळू वेळ वाढवावा. योग्य प्रकारे आसन जमणाऱ्या व्यक्तींनी ३ ते ५ मिनिटे हे आसन करण्यास हरकत नाही.
Comments
Post a Comment