हल्ली अनेक जणांना थायरॉईड चा त्रास होताना दिसतो. यावर उपाय म्हणून लोक वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या घेतात. ज्याचे अनेक दुष्परिणाम त्यांच्या शरीरावर होताना दिसतात. मात्र, थायरॉईड चा त्रास घरच्या घरी ठीक करायचा असल्यास त्यावर सर्वांगासन हा अतिशय उत्तम पर्याय आहे. सर्वांगासनाच्या नियमित अभ्यासाने थायरॉईड चा त्रास घरच्या घरी नैसर्गिक रित्या तसंच कुठल्याही प्रकारच्या गोळ्या घेतल्या शिवाय बरा करता येतो.
बद्धकोष्ठता हा सुद्धा माणसाच्या आयुष्यात हल्ली एक खूप मोठा त्रास मानला जातो. मात्र, बद्धकोष्ठतेवर अतिशय चांगला उपाय म्हणून सुद्धा सर्वांगासन या आसनाचा तुम्ही नियमित सराव करू शकता. याच बरोबर सर्वांगासनामुळे आपल्या शरीराला इतरही अनेक फायदे होतात.
आज आपण बद्धकोष्ठता दूर करा सर्वांगासनाने या लेखात सर्वांगासन म्हणजे काय? हे आसन करण्याची योग्य पद्धत आणि त्याचे फायदे इत्यादी माहिती घेणार आहोत. तसंच हे आसन करताना काय काय खबरदारी घ्यावी आणि हे आसन कधी आणि किती वेळ करावे ही माहिती सुद्धा घेणार आहोत.
सर्वांगासन म्हणजे काय?
सर्वांगासन या आसनात आपलं संपूर्ण शरीर आपले खांदे आणि काही प्रमाणात आपल्या मानेवर तोलून धरायचं असतं. म्हणूनच या आसनाला इंग्रजीमध्ये शोल्डर स्टँड पोज असं म्हणतात. म्हणजे खांद्यांवर आपल्या शरीराचा भार तोलून केलेलं आसन.
या आसनाची स्थिती खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे दिसते. या आसनाच्या नियमित अभ्यासामुळे थायरॉईड ग्रंथींच्या कार्यावर चांगला परिणाम दिसून येतो. थायरॉईड ग्रंथी संपूर्ण शरीराचे कार्य सुधारण्यास मदत करते आणि शरीरातील इतर ग्रंथींना नियंत्रित करते त्यामुळेच थायरॉईडला सर्व ग्रंथींचा राजा म्हटले जाते. आणि या आसनामुळे थायरॉईड ग्रंथींच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येतो.
आज आपण सर्वांगासनाच्या करण्याच्या स्टेप्स आणि फायदे जाणून घेणार आहोत.
सर्वांगासन करण्यापूर्वी घ्यावयाची खबरदारी
- सर्वांगासन करण्यासाठी अंगात तेवढी ताकद असावी लागते. कमजोर व्यक्तींनी हे असं शक्यतो करू नये कारण या आसनात शरीराचा सगळं भार खांदे आणि मानेवर तोलून धरावा लागतो. त्यामुळे सुरुवातीला सूर्यनमस्कार घालून प्रथम शरीर बळकट बनवावे आणि मग या आसनाचा अभ्यास करावा.
- हे आसन सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. कमकुवत आरोग्य असलेल्या लोकांनी हे आसन करताना खूप काळजी घ्यावी.
- या आसनाचा अभ्यास करताना आसन स्थिती नीट जमत नसल्यास उगाचच जोरजबरदस्तीने हे आसन करू नये. सहजतेने जमेल तोपर्यंतच हे आसन करा.
- हे आसन करताना श्वास सामान्य ठेवा.
सर्वांगासन कसे करावे?
सर्वांगासन करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या अंगात पुरेशी ताकद असावी लागते. कारण या आसनामध्ये आपल्या शरीराचा संपूर्ण भार आपल्या मानेवर आणि आपल्या दोन्ही हातांवर तोलून धरावा लागतो. तसंच पायाची स्थिती सुद्धा सरळ ठेवावी लागते. तसंच पाय स्थिर ठेवावे लागतात.
त्यामुळे सुरुवातीला हे आसन भिंतीच्या आधाराने करण्याचा प्रयत्न करावा ज्यामुळे आपल्या शरीराचा तोल आपल्याला भिंतीच्या आधाराने सांभाळता येऊ शकेल आणि त्यामुळे पुढे काही दुखापत होणं टाळता येईल.
पहिली पायरी
- हे आसन करण्यासाठी मऊ बसकर किंवा योगा मॅट जमिनीवर अंथरा.
- त्यानंतर आपल्या पाठीवर झोपा. पाय लांब करा आणि एकमेकांच्या जवळ ठेवा.
- आता, तुमचे पाय जमिनीपासून हळूहळू वरच्या दिशेने उचला. (पाय थेट वर उचलण्यासाठी तुमच्या पोटाच्या स्नायूंमध्ये तेवढी ताकद असावी लागते).
- पाय वर उचलण्यासाठी त्रास होत असेल तर आधी पाय गुडघ्यात दुमडा मग हळूहळू वर उचला.
- एकदा या स्थितीत स्थिर झाल्यानंतर, आपल्या हाताचा आधार घेऊन आपली कंबर उचलण्याचा प्रयत्न करा. पण हलासनप्रमाणे तुमचे पाय डोक्याच्या दिशेने जाणार नाहीत याची काळजी घ्या.
- सुरुवातीला कंबरेचा भाग थोडासा उचला. एकदम जास्त उचलू नका कारण त्यामुळे तुमच्या पाठीला,हाताला किंवा मानेला लचक किंवा दुखापत होण्याची शक्यता असते. कंबरेचा हात सोडू नका.
- या स्थितीत २ ते ५ सेकंद थांबा आणि मग हातांच्या मदतीने कंबर हळूहळू खाली घ्या आणि मग पायही खाली घ्या.
ही होती पहिली पायरी. ही पायरी नीट जमायला लागली की मग पुढच्या पायरीचा अभ्यास करायला हरकत नाही.
दुसरी पायरी
- आधी पहिल्या पायरीतल्या १ ते ५ स्टेप्स करा.
- मग हळूहळू हाताच्या मदतीने कंबरेचा भाग उचला. यावेळी कंबर जेवढी जमेल तेवढी उचला.
- तुमचे पाय सरळ ठेवा आणि पायाची बोटे वरच्या दिशेने ठेवा.
- आपले डोळे बोटांवर ठेवा आणि आपले तोंड बंद ठेवा.
- तुमच्या शरीराचे वजन तुमच्या खांद्यावर आणि मानेवर असावे याची खात्री करा.
हे सर्वांगासनाची अचूक स्थिती आहे. ही स्थिती जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्हाला सर्वांगासन सिद्ध झाले असं म्हणता येईल. सुरुवातीला हे आसन भिंतीचा आधार घेऊनही करता येईल.
सर्वांगासन कधी करावे?
- हे आसन सकाळी किंवा संध्याकाळी केले जाऊ शकते. परंतु केवळ रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर ३ ते ४ तासांनंतर करावे.
- हे आसन शिर्षासनापूर्वी किंवा नंतर करता येते.
सर्वांगासन किती वेळ करावे?
- नवशिक्या व्यक्ती हे असं ५ ते १० सेकंदांसाठी करू शकतात आणि दर आठवड्याला २ ते ५ सेकंदांनी वेळ वाढवू शकतात.
- काही दिवसांच्या सरावानंतर, तुम्ही ते ३ ते ५ मिनिटांपर्यंत करू शकता. मात्र ५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ हे आसन करू नये.
सर्वांगासनाचे फायदे काय?
- थायरॉईड ग्रंथींच्या आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. हे आसन थायरॉईड ग्रंथींवर चांगला दबाव निर्माण करते आणि त्यांचे कार्य योग्य प्रकारे सुधारण्यासाठी मदत करते.
- गुरुत्वाकर्षणाचा नियम लक्षात घेता, ते निरोगी होण्यासाठी थायरॉईड ग्रंथींना ताजे रक्त पुरवते.
- या आसनामुळे पाठीच्या कण्यावर चांगला दबाव निर्माण होतो ज्यामुळे पाठीचा कणा आणि मानेची ताकद वाढते.
- ही आसनस्थिती गुरुत्वाकर्षणाच्या बरोबर उलट आहे, त्यामुळे वापरलेले रक्त हृदयाकडे परत जाते जे शरीरातील रक्तसंचार आणि हृदयाचे कार्य सुधारण्यासाठी फायदेशीर आहे.
- या आसनात संपूर्ण शरीराचे वजन हातांवर असल्याने हातांची ताकद वाढते.
- या आसनाच्या नियमित अभ्यासाने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी किंवा बंद होतो.
तर मंडळी आज आपण सर्वांगासन मराठी - माहिती आणि फायदे या लेखात सर्वांगासनाची संपूर्ण माहिती जाणून घेतली. हे आसन शक्यतो अशक्त लोकांनी करणे टाळावे. मात्र एकदा हे आसन तुम्हाला जमले कि त्याचा दररोज सराव करत राहा ज्यामुळे ते तुम्हाला चांगल्या आरोग्याच्या रूपात चांगले परिणाम देईल.
FAQ
संध्याकाळी सर्वांगासन करता येईल का?
हे आसन सकाळी किंवा संध्याकाळी केले जाऊ शकते. परंतु केवळ रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर ३ ते ४ तासांनंतर करावे.
सर्वांगासन कोणत्या प्रकारची मुद्रा आहे?
सर्वांगासनात शरीराचा सगळा तोल खांद्यावर सांभाळावा लागतो त्यामुळे याला इंग्रजीत शोल्डर स्टॅन्ड पोज म्हणतात.
आपण शीर्षासन आणि सर्वांगासन एकत्र करू शकतो का?
हो. शीर्षासन आधी मग सर्वांगासन किंवा याउलट असा अभ्यास आपण करू शकतो.
सर्वांगासन सोपे आहे का?
नाही. सर्वांगासन हे आसन शक्यतो अशक्त लोकांनी करू नये कारण हे आसन करायला जास्त ताकद लागते. त्यामुळे दिसायला सोपे वाटले तरी हे आसन करण्यासाठी शरीरात पुरेशी ताकद आणि लवचिकता आवश्यक असते.
सर्वांगासन कोणी करू नये?
उच्च रक्तदाब, स्लिप डिस्क, व्हर्टिगो, एथेरोस्क्लेरोसिस, सेरेब्रल थ्रोम्बोसिस मायग्रेन, गरोदर आणि स्तनपान करणा-या स्त्रिया आणि डायबेटिक रेटिनोपॅथी असलेल्या आणि शस्त्रक्रिया झालेल्या लोकांनी खांद्यावर उभे राहणे टाळावे. सर्दी, फ्लू आणि सायनसचा त्रास असलेल्या रुग्णांनीही सर्वांगासन टाळावे.
Comments
Post a Comment