Skip to main content

मत्स्यासन मराठी - माहिती आणि फायदे

आज आपण मत्स्यासन मराठी - माहिती आणि फायदे या लेखात मत्स्यासन म्हणजे काय? हे आसन करण्याची योग्य पद्धत आणि त्याचे फायदे इत्यादी माहिती घेणार आहोत.

मत्स्यासन मराठी - माहिती आणि फायदे

मत्स्यासन म्हणजे काय?

मत्स्यासन हे सर्वांगासनाच्या बरोबर उलट स्थिती असलेले आसन आहे. सर्वांगासनामध्ये आपल्याला पाठ आणि मानेवर ताण येतो. मत्स्यासनामध्ये आपल्याला वरच्या आणि खालच्या ओटीपोटावर, गळ्यावर, मांडीची पुढची बाजू इत्यादींवर ताण येतो. म्हणूनच, सर्वांगासन करून झाल्यानंतर हे आसन करावे.

आता आपण सर्वप्रथम मत्स्यासन करण्यासाठीच्या पायऱ्या आणि मग त्याचे फायदे जाणून घेणार आहोत. पण मत्स्यासन सिद्ध करण्यासाठी तुम्हाला आधी पद्मासन सिद्ध करावे लागेल म्हणजे पद्मासनाचा चांगला अभ्यास करावा लागेल आणि पद्मासन नीट जमायला लागले कि मगच मत्स्यासन करणे सोपे जाईल. कारण मत्स्यासन करण्याची पहिली पायरी पद्मासन आहे.

काही जण पद्मासनाऐवजी सिद्धासन किंवा सुखासन करतात पण या दोन पैकी कुठल्याही आसनस्थितीत मत्स्यासन केल्यास मत्स्यासनाच्या स्थितीत पाय सुटण्याची शक्यता असते. म्हणून पद्मासनच करणे योग्य आहे.

तसंच हे आसन अंगात पुरेसा लवचिकपणा आणि ताकद असलेल्यांनीच केले पाहिजे. त्यामुळे अंगात पुरेसा लवचिकपणा आणि ताकद येण्यासाठी आधी निदान महिनाभर रोज सूर्यनमस्कार घाला.

मत्स्यासन करण्याच्या पायऱ्या किंवा स्टेप्स

पहिली पायरी

  1. हे आसन करण्यासाठी मऊ बसकर किंवा योगा मॅट जमिनीवर अंथरा.
  2. प्रथम पद्मासनावर बसा किंवा पद्मासनाची स्थिती घ्या. पद्मासनावर स्थिरावल्यावर हळूहळू जमिनीला पाठ टेकवण्याचा प्रयत्न करा.
  3. किंवा याउलट करा म्हणजे आधी जमिनीवर उताणे झोपा. पाय सरळ जमिनीवर पसरा आणि मग पद्मासनाची स्थिती घ्या.
  4. या स्थितीत २ ते ५ सेकंद रहा. मात्र शरीराच्या कुठल्याही भागावर जास्त ताण येत असेल तर आसन स्थिती लगेच सोडा.

पद्मासनाच्या स्थितीत जमिनीला पाठ टेकणे अवघड जाते. त्यामुळे जमिनीला पाठ टेकण्यासाठी मागे झुकताना हातांचा आधार घ्या. समजा पाय उचलले जात असतील तर जाऊ द्या. फक्त पद्मासनाची स्थिती सोडू नका आणि पूर्णपणे पाठ जमिनीला टेकल्यावर पाय हळूहळू जमिनीवर टेकवा.

ही मत्स्यासनाची पहिली पायरी होती. मत्स्यासनाचा अभ्यास करणाऱ्या नवीन अभ्यासूंनी सुरुवातीला फक्त पहिल्या पायरीचा अभ्यास काही दिवस करावा आणि त्याचा पूर्णपणे सराव झाल्यावर मग दुसऱ्या पायरी कडे वळावे

दुसरी पायरी

  1. पद्मासनाची दुसरी पायरी सुरू करण्यासाठी पहिल्या पायरीतील एक आणि दोन स्टेप्स कराव्यात
  2. आता, हाताच्या बोटांनी संबंधित पायाच्या अंगठ्याला पकडा, म्हणजे उजव्या हाताच्या बोटांनी उजव्या पायाच्या अंगठ्याला आणि डाव्या हाताच्या बोटांनी डाव्या पायाच्या अंगठ्याला पकडा.
  3. आता, टाळूचा भाग जमिनीवर टेकवण्यासाठी हनुवटी हळूहळू वर उचलण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही टाळूचा भाग पूर्णपणे जमिनीवर टेकवाल तेव्हा मत्स्यासन सिद्ध झाले असे म्हणता येईल.

मत्स्यासनाला सर्वांगासना एवढी ताकदीची गरज नाही, परंतु त्याची सवय होण्यासाठी सराव आवश्यक आहे.



मत्स्यासन करण्यापूर्वी घ्यावयाची खबरदारी

  • या आसनाचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • हे आसन सकाळी किंवा संध्याकाळी केले जाऊ शकते, परंतु केवळ रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर ३ ते ४ तासांनंतर करणे योग्य आहे.
  • या आसनाचा सराव करताना सहजपणा वाटत नसल्यास जबरदस्तीने आसन करू नका. जोपर्यंत तुम्हाला सहजपणा वाटतो तोपर्यंतच हे करा.
  • हे आसन सर्वांगासन नंतर केले पाहिजे कारण ते सर्वांगासनामध्ये येणाऱ्या ताणाच्या अगदी विरुद्ध बाजूस ताण निर्माण करते.

मत्स्यासनाचे फायदे

  • मत्स्यासनामुळे थायरॉइड (गळ्यातील ग्रंथी), ओटीपोटातील स्नायू आणि अंडकोशांमधील ग्रंथींना ताण येतो. त्यामुळे थायरॉईडशी संबंधित आजार नष्ट होतात किंवा आटोक्यात येतात
  • ओटीपोटात आणि पाठीच्या दोन्ही भागात पचन आणि रक्त परिसंचरण सुधारण्यासाठी हे मत्स्यासन फायदेशीर आहे.
  • पोटातील स्नायूंना योग्य ताण मिळाल्यामुळे आपोआपच रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
  • पोटावरील चरबीचा अतिरिक्त थर कमी होतो.
  • रक्ताचे उत्पादन वाढते.
  • अनेक वर्षे तारुण्य टिकवून ठेवण्यास मदत होते.
  • हस्तमैथुनात वाया गेलेली ऊर्जा/शक्ती पुन्हा निर्माण करण्यात मदत होते.

तर मंडळी, आज आपण मत्स्यासन मराठी - माहिती आणि फायदे या लेखात मत्स्यासनाच्या पायऱ्या आणि फायदे जाणून घेतले. हे आसन शरीराला अनेक प्रकारचे फायदे देतं. त्यामुळे दररोज त्याचा सराव करत राहा आणि ते तुम्हाला चांगले परिणाम देईल.

Comments