आज आपण शीर्षासन मराठी - माहिती आणि फायदे या लेखात शीर्षासन या आसनाची माहिती घेणार आहोत ज्यामधे आपण बघणार आहोत या आसनाची माहिती, हे आसन करायची योग्य पद्धत किंवा विधी आणि या आसनाचे फायदे.
शीर्षासन म्हणजे काय?
शीर्षासन म्हणजे तुमच्या हातांच्या मदतीने तुमच्या डोक्यावर संपूर्ण शरीर संतुलित करणे आणि असे करताना तुमचे दोन्ही पाय वरच्या दिशेने नेणे. ही स्थिती आपल्या पायावर उभे राहण्याच्या अगदी उलट आहे. याला खाली डोके वर पाय असेही म्हणतात.
या आसनाची अचूक स्थिती खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे दिसते. हे एक खूप महत्त्वाचे आसन आहे जे दररोज केले पाहिजे. आजच्या ताणतणावाच्या जीवनशैलीत प्रत्येक व्यक्तीला आवश्यक असलेले अनेक फायदे शीर्षासनामुळे आपल्याला मिळू शकतात.
सुरुवातीला शीर्षासन साध्य करणे थोडे कठीण दिसते. परंतु जर तुम्ही दररोज योग्य प्रकारे हळूहळू त्याचा सराव केलात तर तुम्ही लवकरच ते व्यवस्थितपणे करू शकाल. पण ते साध्य करण्यासाठी घाई करू नका कारण शीर्षासनाच्या या स्थितीत संपूर्ण शरीराचे संतुलन फक्त डोके आणि दोन्ही हातांवर ठेवावे लागते. थोडक्यात खाली डोकं वर पाय अशी स्थिती असते.
शीर्षासन जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल, तर तुम्ही खाली दिलेल्या तीन वेगवेगळ्या शीर्षासन पद्धतीचे अनुसरण केले पाहिजे आणि अंतिम स्थिती प्राप्त करण्यासाठी त्याच क्रमाने अभ्यास केला पाहिजे. कृपया एकदम पूर्ण आसनस्थिती करण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा ते तुमचे नुकसान करू शकते.
शीर्षासन स्टेप्स
जेव्हा तुम्ही शीर्षासन आयुष्यात पहिल्यांदा किंवा बर्याच काळानंतर करता तेव्हा तुम्ही अंतिम स्थिती साध्य करण्यासाठी खालील स्थितीचे अनुसरण केले पाहिजे. सुरुवात करणे सोपे व्हावे यासाठी आम्ही शीर्षासनाच्या तीनही स्थितीच्या आकृत्या दिल्या आहेत.
शीर्षासनाचा अभ्यास सुरुवातीला किंवा आवश्यक असल्यास त्या नंतर सुद्धा भिंतीच्या आधाराने करावा म्हणजे अंतिम स्थिती साध्य करणं सोपं जाईल.
प्राथमिक स्थिती
- सर्वात आधी एखाद्या मऊ बसकर किंवा योग मॅटवर बसा. शरीराचा सगळा ताण घालवण्यासाठी शरीर अगदी सैल सोडून द्या आणि मंद श्वासोच्छवास चालू ठेवा.
- मग गुडघ्यावर बसून दोन्ही हातांची बोटे एकमेकांना चिकटवा किंवा एकमेकांमध्ये गुंफा.
- गुंफलेली बोटे (हाताचा बाहेरचा भाग) जमिनीवर ठेवा आणि डोक्याचा वरचा भाग ज्याला आपण टाळू म्हणतो तो गुंफलेल्या बोटांवर म्हणजे हाताच्या तळव्यावर ठेवा. (खालील चित्र पहा)
- नंतर आपली कंबर हळू हळू उचला आणि आपल्या शरीराचे वजन आपल्या डोक्यावर (टाळूवर) पेलण्याचा प्रयत्न करा. (खालील चित्र पहा)
ही शीर्षासनाची प्राथमिक स्थिती आहे. सुरुवातीला ही स्थिती नीट जमेपर्यंत हीच स्थिती साध्य करण्याचा प्रयत्न करा. एकदा तुम्हाला ही स्थिती जमायला लागली कि मग पुढील स्थितीत जाण्याचा प्रयत्न करा.
स्थिती दुसरी
एकदा प्राथमिक स्थिती नीट जमायला लागली कि मग पुढच्या स्थितीचा अभ्यास करायला घ्या.
- दुसऱ्या स्थितीत जाण्यासाठी वर सांगितल्या प्रमाणे प्राथमिक स्थितीच्या १ ते ४ स्टेप्स करा.
- त्यानंतर पाय हळूहळू वरच्या दिशेने उचला. जोपर्यंत पाय हवेत व्यवस्थित संतुलित होत नाहीत म्हणजे पाय वर ठेवून शरीराचं संतुलन जमत नाही तोपर्यंत पाय सरळ करू नका तर गुडघ्यात दुमडलेले ठेवा. (खालील चित्र पहा)
- एकदा तुम्हाला पायांचा समतोल साधता आला की, तुमचे पाय हळू हळू सरळ करण्याचा प्रयत्न करा. हा शीर्षासनाचा अंतिम टप्पा आहे.
एकदा तुम्हाला पाय सरळ करून शरीराचा समतोल साधता आला की शीर्षासन साध्य झाले असे म्हणता येईल.
शीर्षासन करण्याचा कालावधी
- सुरुवातीच्या टप्प्यात, हे आसन ३ ते ५ सेकंदांपासून सुरू केले जाऊ शकते.
- थोडी सवय झाल्यावर दर ७ ते १५ दिवसांनी ते ३ ते ५ सेकंदांनी वाढवू शकता आणि हळूहळू ते १ मिनिटापर्यंत वाढवू शकता.
- जेव्हा तुम्ही शीर्षासनाची शेवटची स्थिती करण्यात प्रभुत्व मिळवाल आणि स्वतःला आणखी काही काळ त्याच्या स्थितीत ठेवू शकाल, तेव्हा तुम्ही १ मिनिट ते १० मिनिटांपर्यंत या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करू शकता.
- मात्र, ज्याक्षणी तुम्हाला अंधारी किंवा चक्कर आल्यासारखी वाटेल तेव्हा लगेच आसनस्थिती सोडून द्या.
शीर्षासन करताना घ्यावयाची दक्षता
- जर तुम्ही नुकतीच योगासने सुरू केली असतील तर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचा आधार घेऊ शकता किंवा भिंतीचाही आधार घेऊ शकता.
- मात्र हे आसन कृपया बळजबरीने करू नका किंवा तुमचा तोल सुटत असल्यास करू नका.
- कुठल्याही प्रकारचं योगासन करण्यासाठी जमिनीवर नेहमी मऊ कापड किंवा चटई ठेवा आणि त्यावर योगाभ्यास करा.
- शीर्षासन करताना श्वासोच्छवास सामान्य ठेवा. आसन करताना तुम्हाला श्वास घेण्यात काही अडचण जाणवत असेल तर कृपया लगेच आसनस्थिती सोडून द्या.
- चक्कर येणे किंवा डोकेदुखी सारखे काही वाटत असल्यास ताबडतोब बंद करा.
- जेव्हा तुम्हाला डोकेदुखी, दातदुखी, वेदना किंवा डोळ्यांना खाज येत असेल तेव्हा कृपया हे आसन करू नका.
- जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा रक्तदाब असेल तर ते करू नका कारण शीर्षासनामध्ये, सर्व रक्त प्रवाह तुमच्या डोक्याकडे जातो ज्यामुळे बीपी असलेल्या रुग्णांना गंभीर समस्या उद्भवू शकतात.
- जेव्हा तुम्हाला ताप किंवा अशक्तपणा येतो तेव्हा हे आसन करू नका.
- कोणतीही दुखापत असलेल्या व्यक्तीने हे आसन करणे टाळले पाहिजे कारण या स्थितीला आपले शरीर उचलण्यासाठी आणि काही काळ हातांच्या मदतीने डोक्यावर ठेवण्यासाठी भरपूर शारीरिक शक्तीची आवश्यकता असते.
शीर्षासनाचे फायदे
- या आसनात मेंदूला रक्तवाहिन्यांपर्यंत चांगला रक्तपुरवठा होतो.
- या आसनामुळे मेंदूला चांगला रक्तपुरवठा होतो ज्यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे इत्यादी मूळ कारणे दूर होतात किंवा होण्याची शक्यता कमी होते.
- या आसनाच्या नियमित सरावाने एक नैसर्गिक उत्साह येतो ज्यामुळे व्यक्ती दिवसभर ताजीतवानी आणि सक्रिय राहते.
- या आसनाच्या नियमित सरावाने बद्धकोष्ठताही कमी होते. खाली डोकं वर पाय अशा उलट्या शारीरिक स्थितीमुळे, पचनसंस्थेवरील ताण कमी होतो ज्यामुळे शेवटी बद्धकोष्ठता कमी होते.
- शरीराचा संपूर्ण भार मान, पाठीचा कणा, हात, पाय अवयवांवर गेल्याने त्या अवयवांची शक्ती वाढते.
- मेंदू हा संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा करणारा नियंत्रक आहे आणि चांगला रक्तपुरवठा झाल्यामुळे मेंदू अधिक सक्रिय होत असल्याने संपूर्ण शरीरातील रक्ताभिसरणही सुधारते.
- तणाव दूर करण्यासाठी फायदेशीर आणि योग्य रक्ताभिसरणामुळे मेंदूच्या पेशींना चालना मिळते.
- पोटाचे कार्य सुधारते.
- पिट्यूटरी आणि पाइनल ग्रंथींना उत्तेजित करते.
- या आसनाच्या अभ्यासामुळे फुफ्फुस मजबूत होतात.
शीर्षासन हे एक उत्तम आसन आहे जे जवळजवळ संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर आहे. जर तुम्ही त्याची इतर प्रकारच्या व्यायामांशी तुलना केली तर, विशेषत: मेंदूला चालना देण्यासाठी कोणतीही तरतूद केलेली नाही. इतर व्यायाम शरीराच्या वरच्या आणि खालच्या भागावर लक्ष केंद्रित करतात. परंतु या आसनस्थितीत, मेंदू आणि त्याच्या कार्यावर चांगला परिणाम होतो. योग ही प्राचीन हिंदू संस्कृतीची जगाला दिलेली देणगी आहे जी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्वत:ला तयार करण्यासाठी प्रत्येक परिस्थितीत फायदेशीर आहे.
जर तुम्हाला शीर्षासन मराठी - माहिती आणि फायदे हा लेख आवडला असेल तर कृपया तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा. म्हणजे त्यांनाही या आसनाबद्दल माहिती होईल आणि त्याचा त्यांनाही लाभ मिळेल.
Comments
Post a Comment