रक्तदाब (Blood Pressure) हा खरंतर वयस्कर लोकांच्या म्हणजे किमान ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीला होणारा आजार मानला जात होता. मात्र गेल्या १० ते १२ वर्षांमध्ये अगदी २० वर्षांच्या मुलांना सुद्धा रक्तदाब (Blood Pressure) हा आजार व्हायला लागला आहे. अनेक जणांमध्ये बरेच दिवस याचं कुठलंही लक्षण दिसत नाही पण हा त्रास हळूहळू त्यांचं नुकसान करत राहतो. म्हणूनच त्याला सायलेंट किलर असं म्हटलं जातं.

मात्र, हा त्रास हल्ली तरुण वयात का होतोय याची काही विशिष्ट कारणं आहेत. आजच्या या लेखामध्ये आपण हीच कारणं बघणार आहोत.

रक्तदाब (Blood Pressure) म्हणजे काय?

आपल्या शरीरातील रक्त वाहिन्या मधून रक्तप्रवाह सतत चालू असतो. रक्त वाहिन्याद्वारे रक्त वेगवेगळ्या अवयवांना पुरवलं जातं आणि जेव्हा रक्तपुरवठा करताना काही कारणांनी रक्तवाहिन्यांवर ताण पडतो त्याला रक्तदाब किंवा Blood Pressure असं म्हणतात.

मात्र, या रक्तदाबाची एक ठराविक मर्यादा असते. ही मर्यादा जर ओलांडली गेली तर त्याला रक्तदाब वाढला किंवा उच्च रक्तदाब असं म्हणतात आणि हा वाढलेला रक्तदाब आपल्या हृदय, किडनी, मेंदू आणि डोळ्यांवर फार मोठा परिणाम करू शकतो.

तरुणांमध्ये रक्तदाब (Blood Pressure) वाढण्याची कारणं

1) खाण्यातील बदल

हल्लीच्या धावपळीच्या युगात तरुण वर्गाला अन्न सुद्धा फास्ट लागतं. त्यामुळे फास्ट फूड आणि वारंवार बाहेरचं खाणं हे हल्लीच्या तरुण पिढीचं रुटीन झालं आहे. या पदार्थांमध्ये साखर, मसाले आणि मीठ यांचं प्रमाण खूप जास्त असतं. जे शरीराला हानिकारक असतं.

जास्त मीठ खाण्यामुळे शरीरात पाणी धरून ठेवलं जातं, जे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण करतं आणि त्यामुळे रक्तदाब वाढतो. अशा प्रकारे जिभेचे चोचले पुरवता पुरवता हे अन्न आपल्याला मोठी किंमत मोजायला लावतं.

2) मानसिक ताणतणाव

हल्ली सगळ्याच क्षेत्रात स्पर्धा, धावपळ आणि अनिश्चितता वाढत चालली आहे. कुटुंब वेगळी झाल्यामुळे आर्थिक जबाबदाऱ्या वाढत जातात आणि हे सगळं पेलता पेलता हळूहळू मानसिक ताणतणाव वाढत चालला आहे. याचा परिणाम हळूहळू तरुण वर्गाच्या मानसिक आरोग्यावर होतो. आणि अशाप्रकारे सततच्या टेन्शनमुळे शरीरातील हार्मोन्स बिघडायला सुरुवात होते, त्यामुळे हृदयाची गती वाढते आणि त्याचा परिणाम म्हणून रक्तदाब वाढतो.

3) व्यायामाचा अभाव

कॉम्पुटर आल्यापासून कचेऱ्यांमध्ये सगळी कामं एका जागी बसून केली जातात. संपूर्ण दिवसाच काम एकाच जागी बसून केलं जातं. कामाचे तासही पूर्वीपेक्षा जास्त झाले आहेत. त्यामुळे पूर्ण दिवसभर शारीरिक हालचाल केली जात नाही. त्यामुळे हळूहळू शरीराची क्षमता कमी होते आणि छोट्या छोट्या हालचालींमुळे सुद्धा रक्तदाब वाढतो.

4) अपुरी झोप

गेल्या काही वर्षात उशिरा पर्यंत ऑफिसचं काम करणे, नाईट लाईफ, रात्रीच्या पार्ट्या, मोबाईल, सोशल मीडिया यामुळे झोपेचे तास कमी होत आहेत. अनेकजण जास्तीत जास्त ५ ते ६ तासांचीच घेतात जी शरीराला अपुरी पडते. अपुऱ्या झोपेमुळे शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नाही. आणि त्यामुळे त्याचा परिणाम शरीराच्या चयापचय क्रियेवर होतो आणि हळूहळू रक्तदाब वाढतो.

5) व्यसनाधीनता

बदलत्या लाइफस्टाईल बरोबरच तरुणांमध्ये हल्ली व्यसनाधीनता खूप मोठ्या प्रमाणात वाढीस लागली आहे. पूर्वी लपून छपून सिगारेट, मद्यपान, तंबाखू अशी व्यसनं केली जात असत. मात्र अनेकजण नोकरीमुळे घरापासून दूर राहतात त्यामुळे हल्ली हे सगळे प्रकार उघडपणे केले जातात.

तसंच चहा, कॉफी घेणं हा प्रकार सुद्धा प्रमाणाबाहेर वाढला आहे. या सगळ्या सवयी रक्तामध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढवतात. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात, परिणामी रक्तप्रवाहाला अडथळा येतो आणि त्याचा हृदयावर ताण येतो आणि रक्तदाब नियंत्रणाबाहेर जातो.

6) लठ्ठपणा

शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम वजन वाढण्यामध्ये होतो. खासकरून, पोटावर वाढलेली चरबी अतिशय घातक असते. वाढलेल्या वजनामुळे अवयवांना रक्तपुरवठा करण्यासाठी हृदयावर जास्त ताण येतो. परिणामी रक्तदाब वाढतो.

7) आनुवंशिकता

कुटुंबातील व्यक्ती म्हणजे आई-वडील किंवा जवळच्या नातेवाईकांना रक्दाबाचा त्रास असेल, तर त्या कुटुंबातील तरुणांमध्येही आपोआपच रक्तदाब होण्याची शक्यता जास्त असते. मात्र फक्त आनुवंशिकता हेच रक्तदाब होण्याचं कारण आहे असं नाही; चुकीची जीवनशैली हे कारण जास्त संयुक्तिक आहे.

BP वाढतं पण त्याची लक्षणं का दिसत नाहीत?

रक्तदाब झालेल्यांना सामान्यपणे डोकेदुखी, चक्कर किंवा थकवा अशी लक्षणं जाणवतात. पण अनेकदा तरुण वय असल्यामुळे शारीरिक क्षमता जास्त असते आणि त्यामुळे यातलं कुठलंही लक्षण दिसत नाही. आणि हेच सगळ्यात जास्त धोकादायक ठरतं.

त्यामुळे सतत रक्तदाब वाढूनही लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे संबंधित व्यक्तीला त्या बाबतीत काही कळतच नाही आणि ती व्यक्ती निष्काळजी राहते. पण त्याचा परिणाम हृदय, किडनी आणि मेंदूवर हळूहळू होत जातो. आणि त्यामुळे भविष्यात अचानक हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता असते.

तरुणांनी BP कधी आणि किती वेळा तपासावं ?

18 वर्षांनंतर किमान वर्षातून एकदा BP तपासणं आवश्यक आहे. जर वजन जास्त असेल, तणाव असेल किंवा कुटुंबात BP चा इतिहास असेल, तर दर 3 ते 6 महिन्यांनी BP तपासणं जास्त सुरक्षित ठरतं. वेळेवर तपासणी केल्यास मोठा धोका टाळता येतो.

BP नियंत्रणात ठेवण्यासाठी तरुणांनी काय करावं?

दैनंदिन जीवनशैलीत योग्य ते बदल करून रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो. आहारात मिठाचं प्रमाण कमी करून, दररोज किमान ३० मिनिटे चालण्याचा व्यायाम करून, किमान ८-९ तास झोप घेऊन, ताणतणाव कमी करण्यासाठी योगासने किंवा ध्यान करून, आपलं वजन नियंत्रणात ठेऊन आणि मुख्य म्हणजे व्यसनांपासून दूर राहून रक्तदाब या एका त्रासापासून आपण कमी वयातच नाही तर आयुष्यभर दूर राहू शकतो

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

जर तुम्हाला BP ची कुठलीही लक्षणं जाणवत असतील उदा. सारखा थकवा येत असेल, छातीत जडपणा किंवा हृदयाचे ठोके जलद पडत असतील, वारंवार चक्कर येत असेल, एखाद्या वेळेस असह्य डोकेदुखी होत असेल जी कुठल्याही उपायांनी थांबत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे.

तसंच काही वेळा फक्त जीवनशैलीत केलेले बदल पुरेसे नसतात. त्यामुळे उपचारांची आणि औषधांची गरज भासते. अशावेळी, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलाही उपचार किंवा औषधं घेणं टाळावं कारण त्याचे मोठे दुषपरिणाम होऊ शकतात.

थोडक्यात, उच्च रक्तदाब हा आज फक्त वयस्कर लोकांचा आजार राहिलेला नाही. बदललेली जीवनशैली, ताण तणाव आणि निष्काळजीपणा अशा कारणांमुळे तरुणांमध्ये BP चा त्रास वाढत चालला आहे. आणि याबाबतीत योग्य वेळी लक्ष दिलं नाही, तर भविष्यात त्याचे परिणाम होऊ शकतात. त्यामुळे योग्य वेळी काळजी घेतली, तर भविष्यात निरोगी जीवन जगता येईल. धन्यवाद.