आजकाल अनेक लोक सतत डोळ्यांची जळजळ, चुरचुर, खाज किंवा धूसर दिसण्याची तक्रार करतात.
यामागचं मुख्य कारण म्हणजे डोळ्यांची नैसर्गिक ओलावा कमी होणं, ज्याला वैद्यकीय भाषेत Dry Eyes असं म्हणतात.

डोळे कोरडे पडण्याची मुख्य कारणं

  • स्क्रीनचा अतिवापर
    हल्ली डिजिटल युग आहे त्यामुळे मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही याचा वापर अनिवार्य झालाय. पण या सर्व गोष्टी पाहताना आपण कमी वेळा डोळ्यांच्या पापण्याची उघडझाप करतो. त्यामुळे डोळ्यांतली ओलावा कमी होत जातो. तसंच कमी उजेडात मोबाईल किंवा टीव्ही बघणे, झोपेतून उठल्यावर लगेच मोबाईलचा वापर,
  • पाणी कमी पिणं
    Dehydration किंवा शरीरात पाण्याची कमतरता असेल तर डोळ्यांवर त्याचा थेट परिणाम होतो.
  • AC, धूळ आणि प्रदूषण
    ऑफिस मध्ये किंवा घरात लावलेल्या AC मधली कोरडी हवा, बाहेरचं धूर धूळ आणि प्रदूषण डोळ्यांची आर्द्रता म्हणजेच कमी करतात
  • झोपेचा अभाव आणि ताण
    कामाचं व्यस्त वेळापत्रक किंवा मोबाईल चा अति वापर यामुळे झोपायला उशीर होतो आणि मग पुरेशी झोप न मिळाल्यास डोळे थकतात आणि कोरडे पडतात.
  • वय वाढणं
    वय वाढल्यानंतर डोळ्यांमध्ये होणारं अश्रूंचं उत्पादन नैसर्गिकरित्या कमी होतं. त्यामुळे सुद्धा डोळे कोरडे पडतात
  • काही आजार आणि औषधं
    डायबिटीज, थायरॉईड यासारखे आजार किंवा काही औषधांच्या साइड इफेक्टमुळे सुद्धा डोळे कोरडे पडू शकतात.

डोळे कोरडे पडल्याची लक्षणं

  • डोळ्यांत जळजळ किंवा चुरचुर
  • डोळ्यांमधून सारखं पाणी येतं
  • डोळ्यांमध्ये सारखं खुपल्यासारखं वाटतं
  • डोळ्यांमधून घाण येतें
  • लालसरपणा
  • सतत डोळे चोळावेसे वाटणं
  • डोळ्यांच्या पापण्यांची सारखी उघडझाप होते
  • धूसर दिसणं
  • प्रकाश सहन न होणं
  • डोळ्यांचा आतला भाग दुखतो
  • डोकं दुखतं किंवा डोळ्यांना थकवा आल्यासारखा वाटतो
  • डोळे मिटल्यावर बरं वाटतं

डोळे कोरडे पडू नयेत यासाठी उपाय

  • दिवसातून किमान ८-९ तास तरी झोप घ्यावी -
    ज्यामुळे डोळ्यांना पुरेसा आराम मिळेल. आणि झोपेतून उठल्यावर लगेच मोबाईलचा वापर टाळावा. झोपेतून उठून थोडा वेळ गेला आणि आपले डोळे बाहेरच्या वातावरणाला सरावले कि मग मोबाईलचा वापर करावा.
  • इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा आवश्यक तेवढाच वापर करावा -
    कारण हल्ली सोशल मीडियाच्या बहुतेक जण आहारी जाताना दिसतात. त्यामुळे त्यांचं कुठल्याच गोष्टीकडे लक्ष नसतं. आणि अशाप्रकारे सतत मोबाईलकडे बघूया डोळ्यांना त्रास होतो म्हणूनच तो त्रास टाळण्यासाठी मोबाईल, काम्पुटर अशा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा कमीत कमी वापर करावा.
  • इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करताना आजूबाजूला पुरेसा उजेड असावा -
    अंधारात शक्यतो मोबाईल वापरू नये. अगदी टीव्ही बघताना सुद्धा खोलीमध्ये दिवे चालू ठेवावे ज्यामुळे टीव्ही बघताना डोळ्यांवर अतिरिक्त ताण येणार नाही आणि टीव्ही बघताना किंवा १० ते १२ फुटांचं अंतर ठेवावं म्हणजे टीव्ही च्या स्क्रीन मधून निघणाऱ्या निळ्या प्रकाशाचा परिणाम आपल्या डोळ्यांवर कमीत कमी होईल. तसंच झोपेतून उठल्यावर सुद्धा लगेच मोबाईल चा वापर करू नये.
  • कंप्युटर किंवा लॅपटॉप वर काम करताना मध्ये मध्ये ब्रेक घ्यावा -
    मधेच ५ मिनिटं डोळे मिटून बसावं आणि डोळे रिलॅक्स झाले कि डोळ्यांवर पाणी मारावं त्यामुळे डोळ्यांना थंडावा मिळेल. यासाठी आवश्यक असल्यास दर अर्ध्या किंवा तासाने गजर लावून ठेवावा म्हणजे आपल्याला स्क्रीन पासून दूर जायचं आहे याची आठवण राहील.
  • भरपुर पाणी प्यावं -
    हवेतील उष्णतेमुळे तुमचे डोळे कोरडे पडत असतील तर शरीराला पाण्याची गरज भासेल तेव्हा पाणी प्यावं. थोडं जास्त पाणी प्यायलं तरी चालेल त्यामुळे शरीरात पाण्याची कमी राहणार नाही. आणि पर्यायाने डोळे कोरडे पडण्याचा त्रास हळूहळू कमी होईल.
  • रात्री झोपताना डोक्याला तसंच तळपायांना खोबरेल तेल लावावं -
    कारण खोबरेल तेल उष्णता कमी करतं त्यामुळे उष्णतेमुळे डोळे कोरडे पडत असतील तर हळू हळू तो त्रास कमी होईल तसंच याचा अजून एक फायदा म्हणजे रात्री झोपताना तळपायांना खोबरेल तेलाने मालिश केल्यामुळे डोळे शांत होतील आणि झोपही चांगली लागेल
  • डोळ्यात काजळ घालावं -
    डोळ्याची जळजळ होत असेल तर डोळ्यात रात्री झोपताना काजळ घालावं. कारण काजळ डोळ्यांमध्ये थंडावा निर्माण करतं ज्यामुळे डोळे शांत होतात.
  • पापण्यांची उघडझाप करावी -
    जागेपणी मध्ये मध्ये थोड्या थोड्या वेळानी पापण्यांची हळू हळू १५ ते २० वेळा उघडझाप करावी. ज्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो, डोळ्यांची स्थिती सुधारते आणि डोळ्यांतल्या अश्रूंच्या ग्रंथी सक्रिय होतात आणि डोळ्यांमध्ये पाणी पुरवण्याचं काम करतात ज्यामुळे डोळे पुन्हा पाणीदार होतात.
  • गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
    हे काही उपाय करून बघावे ज्यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा सामान्य असेल तर तो हळूहळू कमी होईल. मात्र हे उपाय करूनही तुमच्या डोळ्यांना त्रास होत असेल तर डोळयांच्या नेत्रतज्ज्ञांचा जाणंच योग्य होईल कारण त्रासाचं नेमकं निदान झाल्याशिवाय तुमचा त्रास बरा होणार नाही. आणि योग्य उपचारांमुळे पुढील धोका टाळता येईल

दुर्लक्ष करू नका

डोळे कोरडे पडणं ही छोटी समस्या वाटली तरी पुढे डोळ्यांच्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वेळेवर काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे.
आजच्या डिजिटल युगात डोळ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. थोड्या सवयी बदलल्या तर डोळे निरोगी आणि ताजेतवाने राहू शकतात.